लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर सुरेश पिंगळे यांनी पेटवून घेत आत्महत्या केल्यानंतर समाजात खळबळ उडाली. मात्र, आत्महत्येनंतर त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत दोन पत्रे सापडली असून, त्यापैकी एका पत्रातून पिंगळे हे सहा महिन्यांपासून कौटुंबिक समस्यांमुळे तणावाखाली असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केला.
पिंगळे यांनी बुधवारी (दि.१८) पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान त्यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंगळे यांच्याकडे असलेल्या पिशवीत दोन पत्रे सापडले. त्यापैकी आठ पानी पत्रात पिंगळे यांना गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक वादातून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. कौटुंबिक वादामुळे ते तणावाखाली होते. नोकरी मिळवण्यासाठी त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, चुकीचा पत्ता दिल्याने त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. पडताळणीत पिंगळे नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीविरोधात कोथरूड, समर्थ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले होते. नामसाधर्म्यामुळे पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यापैकी दोन पोलीस ठाण्यातील अहवालात सुरेश पिंगळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल नसल्याचा अहवाल पाठविण्यात आला होता. कोथरूड पोलिसांकडून पडताळणी अहवाल मिळणे बाकी होते, असे गुप्ता यांनी सांगितले.
शासन निर्णयानुसार तीस दिवसांच्या कालावधीत दाखला देणे बंधनकारक आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
---------------------------------
चौकशी सुरू - गृहमंत्री
सुरेश पिंगळे यांनी आत्महत्या केल्याची घटना दुर्देैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसऱ्याच एका व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्राथमिक चौकशीत पिंगळे यांना दाखला मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
- दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री
----