पुणे: अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असून, माईंच्या मुलांवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबाबत माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी वैराळकर यांना सिंधुताई सपकाळ यांच्याशी काही बोलणे झाले होते का, त्या काय म्हणाल्या होत्या, असे विचारले. त्यावर माझी मुले कशी आहेत. माझ्या मुलांची काळजी घ्या, हाच विचार सिंधुताईंच्या मनात होता, असे वैराळकर यांनी सांगितले.
सिंधुताई यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी बोलणे झाले होते. माझ्या मुलांचे कसे आहे, त्यांचे सर्व व्यवस्थित सुरू आहे ना, मुलांची व्यवस्थित सोय राहू द्या. शेवट्या क्षणापर्यंत त्यांनी सांभाळलेल्या हजारो मुलांची त्या चौकशी करत होत्या, असे सुरेशकुमार वैराळकर यांनी सांगितले.
सिंधुताईंच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा
सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरु होते. त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. सिंधुताई यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारकडून त्यांना २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याआधी २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.