पुणे : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात ससून रुग्णालयातील परिचारिका, वर्ग ३ व ४ चे कर्मचारी, टेक्निशियन यांनीही सहभाग घेतला. रुग्णसेवा अन् प्रशासकीय कामकाजालाही याचा फटका बसला. तातडीच्या वगळता नेहमीच्या तुलनेत हाेणाऱ्या लहान व माेठ्या शस्त्रक्रिया मंगळवारी निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात घटल्या. रुग्णसेवेवर फारसा परिणाम न हाेण्यासाठी उपाययाेजना केल्याचे प्रशासनाने सांगितले.
ससून रुग्णालयात जुनी व नवीन अकरा मजली इमारत मिळून १७०० हून अधिक बेड आहेत. येथे रुग्णसेवेसाठी ७८३ परिचारिका आहेत. त्यापैकी ७७३ जणींनी संपात सहभाग घेतला. तर शासकीय सेवेतील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी यांची संख्या ६२२ असून, त्यापैकी ९९ टक्के म्हणजे ६१७ जणांनी संपात सहभाग घेतला हाेता. परंतु, खासगी एजन्सीकडून आउटसाेर्स केलेले १२० कर्मचारी असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण आला. प्रामुख्याने वाॅर्डमधील स्वच्छता, रुग्णांना वाॅर्डात घेऊन जाणे आदी कामांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. रुग्णांना ट्राॅली, व्हीलचेअरवरून रुग्णांच्या नातेवाईकांनाच घेऊन जावे लागले.
ओपीडीवर परिणाम नाही :
दरराेज ससूनमध्ये बाह्यरुग्ण विभागात सरासरी १८०० रुग्ण उपचार घेतात. मंगळवारीही सकाळ आणि दुपारच्या स्पेशल ओपीडीमधील बाह्यरुग्ण विभागातील मिळून १७१२ जणांनी उपचार घेतले. ओपीडीमध्ये डाॅक्टर असतात. डाॅक्टर संपात सहभागी नसल्याने बाह्यरुग्ण विभागात फारसा परिणाम झाला नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. भारती दासवाणी यांनी दिली.
नियाेजित सर्व शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे :
ससून रुग्णालयातील सर्वच नियाेजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. माेठ्या शस्त्रक्रिया दरराेज सरासरी ४० ते ४५ हाेत असतात, मंगळवारी त्यापैकी केवळ १० शस्त्रक्रिया झाल्या. यामध्ये ट्रामामधील ३, जनरलच्या ३ सिझेरियन ४ शस्त्रक्रियांचा समावेश आहे. किरकाेळ शस्त्रक्रिया दरराेज सरासरी ८० ते १०० हाेतात, मात्र संपामुळे ती मंगळवारी एकही झाली नाही. १५ रुग्णांचे डायलेसिस करण्यात आले. तर कॅज्युअल्टीमधील सर्वच प्रकारच्या प्रक्रिया पार पडल्या.
डाॅक्टरांनीच उघडले केबिन
वर्ग ३ व ४ चे कर्मचारी हे स्वच्छतेसह डाॅक्टरांचे केबिन उघडण्यापासून लिपिकाची कामे, टायपिंगची कामे करतात. मात्र, जवळपास सर्वच कर्मचारी संपावर असल्याने काही डाॅक्टरांना त्यांचे केबिन स्वत:च उघडावे लागले.
अधिष्ठाता कार्यालयातही शुकशुकाट :
अधिष्ठाता कार्यालयात देखील शासकीय सेवेतील कर्मचारी नव्हते. त्यामुळे केबिन उघडण्यापासून स्वच्छता करणे, इतर शिपायांची कामे कंत्राटी तत्त्वावरील स्टाफकडून करून घेतली गेली. कर्मचारी नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला.
संपामुळे रुग्णसेवेवर झालेला परिणाम
- रुग्णसेवेचा प्रकार : सरासरी रुग्ण : दि. १४ राेजी उपचार घेतलेले रुग्ण
बाह्यरुग्ण विभाग : १८०० : १७१२
आंतररुग्ण विभाग : २४० : ४८ (दुपारी चार वाजेपर्यंत)
संपात सहभागी कर्मचारी
संवर्ग - कर्मचारी - संपात सहभागी - उपस्थित
वर्ग ३ (कर्मचारी) -168 - 163 - 5
वर्ग ३ (नर्सिंग) - 783 - 774 - 9
वर्ग ४ - 454 - 454 - 0
रुग्णसेवा विस्कळीत हाेऊ नये यासाठी मार्डचे डाॅक्टर, प्रशिक्षणार्थी डाॅक्टर, प्रशिक्षणार्थी परिचारिका यांना वाॅर्डमध्ये सेवा दिली. तसेच वर्ग तीन व चारचे कर्मचारी यांचे कामे कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आले. इमर्जन्सी सर्व्हिस सुरू आहे आणि शस्त्रक्रियादेखील काही प्रमाणात सुरू आहेत.
- डाॅ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय