पुणे : केवळ चारच दिवस महाविद्यालयात जाऊन हजेरी लावली आणि त्यानंतर घरीच राहून, ऑनलाइन क्लास करून त्याने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या एकाच परीक्षेत नव्हे तर आयुष्याच्या परीक्षेतही तो सक्षमपणे उत्तीर्ण झाला; कारण त्याच्या उजव्या पायावर तीन सर्जरी झाल्या आणि ४५ टाके पडले होते. या सर्वांवर मात करून त्याने बारावीत ८६ टक्के मिळविले. त्याचे नाव पार्थ राहुल भोसले.
दोन्ही पायांना आजार झाल्याने त्यांवर मोठी सर्जरी करण्यात आली होती. त्यामध्ये तो सहा महिने तरी बेडवर आराम करीत होता. तशा अवस्थेमध्येही पार्थने बारावीचा अभ्यास सोडला नाही. आरोग्याच्या परीक्षेसोबत बारावीची परीक्षाही पास व्हायची, असा त्याने निर्धार केला होता. त्याच्या उजव्या पायाच्या घोट्यावर, मांडीवर तीन सर्जरी झाल्या. जवळपास नऊ तास त्यासाठी गेले. त्यात ४५ टाके घालण्यात आले. त्यानंतर पुढील सहा महिने त्याला केवळ बेडवर आराम करण्याचा सल्ला मिळाला. त्याला असह्य वेदनांचा त्रास सहन करावा लागत होता. तरी त्याने अभ्यास मात्र सोडला नाही. अभ्यास केल्यानंतर परीक्षा देतानाही त्याला खूप अडचणी आल्या. प्रीलिम परीक्षेसाठी वेगळा रायटर, बोर्ड परीक्षेसाठी वेगळा रायटर, फ्रेंच पेपरसाठी आणि इतर विषयांसाठी वेगळा अशा सर्वांसाठी त्याला लिहिणारे हात हवे होते. त्यासाठी त्याला सहकार्यही मिळाले. एवढ्या अडचणी पार करून त्याने परीक्षा दिली. त्याला आत्मविश्वास होता की, ९० टक्के मिळतील. त्याची डॉक्टर तरल नागदा यांनादेखील त्याच्या अभ्यासावरून ९० टक्के मिळतील, असे वाटत होते. पार्थच्या जिद्दीने त्याला ८६.५ टक्के मिळाले. त्यामुळे घरातील सर्वांनाच प्रचंड आनंद झाला. घरच्यांनी त्याला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
''पार्थला होत असलेला त्रास पाहून वाईट वाटायचे; पण त्याने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. खूप मेहनत घेतली आणि अखेर चांगले यश मिळविले. - राहुल भोसले, पालक''