लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : शस्त्रक्रियेत गुडघ्या खालील कापलेल्या पायाची योग्य विल्हेवाट न लावता तो थेट कचरा गाडीत टाकल्याची घटना नारायणगाव येथे गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि त्याची सहकारी असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. अजय धोंडीभाऊ मते व रुग्णालयात काम करणाऱ्या सुनीता जाधव या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी (दि. २२) कचरागाडीत गोळा केलेला कचरा वारुळवाडी हद्दीतील कचरा डेपोत खाली करताना त्यात एक मानवी पाय सापडला. हा पाय सडलेला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सकाळी १०.३० वाजता रीतसर पंचनामा करून अधिक माहिती घेतली. नारायणगाव येथील डॉ. मते रुग्णालयात एक रुग्ण भरती झाला होता. त्याचा पाय गँगरीनमुळे निकामी झाला होता. निकामी झालेला डावा पाय हा डॉ. मते यांनी शस्त्रक्रियेद्वारे गुडघ्याच्या खाली पासून कापला होता. मात्र, या पायाची शासनाच्या निकषांनुसार योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असताना डॉ. मते यांनी लक्ष दिले नाही. रुग्णालयातील मावशी सुनीता जाधव यांनी निष्काळजीपणे हा पाय कचऱ्यामध्ये टाकला. या घटनेमुळे संसर्गजन्य रोग पसरू शकतो याची जाणीव असताना सुद्धा त्यांनी हे घातक कृत्य केल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.