पुणे : कोरोना संकट आज असेल उद्या नाही पण माणुसकी काल होती आज आहे आणि उद्याही राहील हे वाक्य अधोरेखित करण्याजोगे आहे. कारण कोरोनाने आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक अशा सर्वच क्षेत्रात माणसुकी व आयुष्याची किंमत काय असते हे दाखवून दिले. पण कोरोनाच्या महामारीचा सामना करताना डॉक्टर,रुग्णालय प्रशासन यांच्यासह अनेक कोविड योध्द्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत निकराने लढा दिला. आता कोरोना महामारीतून सावरताना हळूहळू समाजजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र अद्यापही कोरोना संकट पूर्णपणे संपलेले नसून काही जणांची कोरोनाशी झुंज सुरु आहे. अशाच एका गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देणाऱ्या रुग्णाचा चक्क आयसीयू विभागात रुग्णालय प्रशासनाने वाढदिवस साजरा करत त्याला सुखद धक्का दिला.
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. पण या परिस्थितीत मावळ येथील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून एक रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहे. त्यांची तब्येत चिंताजनक होती. पण गेल्या दोन दिवसांपासून या रुग्णाने डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देण्यास सुरुवात केली होती. पण रुग्णालयात उपचार सुरु असल्याकारणाने यावर्षी कोविड रुग्णाचा वाढदिवस साजरा करता येणार नव्हता. यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कुठेतरी रुखरुख लागलेली होती. ही गोष्ट डॉक्टरांपाशी बोलून दाखवली.त्यानंतर डॉक्टरांनी कोविड रुग्णाचा वाढदिवस साजरा करायचे ठरवले. मग काहीवेळातच रुग्णालय स्टाफ कामाला लागला. आणि या रुग्णाच्या आयुष्यातील वेदनामय क्षणांना आनंदात परावर्तित केले. मात्र रुग्णालय प्रशासनाने दाखविलेल्या या उत्साह व सहकार्यामुळे रुग्णांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा भावपूर्ण क्षण अनुभवल्यावर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी वाढदिवस साजरा न करता येण्याची खंत कुटुंबियांनी डॉक्टरांजवळ बोलून दाखविल्यानंतर रुग्णालय स्टाफने आकर्षक डेकोरेशन करत आयसीयू विभागाला थेट बर्थडे हॉलमध्ये परावर्तित केले. आणि आनंदाने त्या रुग्णाचा वाढदिवस साजरा केला. यामुळे अचानक घडलेल्या प्रसंगाने या रुग्णाला आपल्यासोबत नेमके काय घडते आहे तेच समजायला काही वेळ लागला. डॉक्टरांनी अनोख्या पद्धतीने दिलेल्या या 'सरप्राईज गिफ्ट' ने त्या रुग्णाच्या चेहऱ्यावर जो काही आनंद दिसला त्याचे वर्णन शब्दात करता येणार नसल्याचे रुग्णालयातील उपस्थित स्टाफने सांगितले. तसेच आयुष्यातील हा क्षण कायम लक्षात राहील या शब्दात आपल्या भावनांना मोकळी वाट करून देतानाच आपल्याला या प्रसंगातून मोठे मानसिक पाठबळ मिळाले असल्याचे देखील सांगितले. तसेच कोरोनावर लवकरात लवकर मात करण्याचा ठाम निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. .