पुणे : तुमचे नाव काय? तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? तुमची जात काय आहे? तुमच्याकडे शेती आहे का, असेल तर ती कुणाच्या नावावर आहे? तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे का? तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे, आदी... असे प्रश्न पुण्यात राहणाऱ्या खुल्या प्रवर्गातील नागरिकांना विचारले जात आहेत. मराठा आरक्षणासंबंधी मंगळवारपासून (दि. २३) घरोघरी सुरू असलेल्या सर्वेक्षणात वरील प्रश्नांद्वारे नाेंदणी केली जात आहे. आठच दिवसांत म्हणजे दि. ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू केले आहे. मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन माहिती गाेळा केली जात आहे. दुसरीकडे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांचे ‘मराठा वादळ’ मुंबईच्या वेशीवर पाेहाेचले आहे. जरांगे पाटील शुक्रवारी (दि. २६) मुंबईत येऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. याची धास्ती घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाने तातडीने हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक सर्वेक्षणात, विद्यार्थी वाऱ्यावर :
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सरकारी यंत्रणांनी वेगाने काम करायला सुरुवात केली आहे. यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी, शाळांमधील शिक्षक यांच्याकडे सर्वेक्षणाचे काम सोपविले आहे. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला टॅब दिले आहे. त्यात सर्व माहिती भरून घेत फॉर्म लगेच सबमिट केला जात आहे. मराठा समाजातील लोकांसाठी १८० प्रश्न, तर खुल्या प्रवर्गातील इतर जातीच्या लोकांना केवळ १० ते १५ प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांमधून नागरिकांच्या एकंदर आर्थिक परिस्थितीचा अंदाज येत असल्याने कर्मचारी आपणहून काही प्रश्न स्किप करत असल्याचेही दिसून येत आहे. तरीही आठ दिवसांत हे सर्वेक्षण पूर्ण कसे होणार, असा प्रश्न कर्मचारी आणि शिक्षकांना पडला आहे.
दररोज होताहेत फक्त २५ ते ३० घरे :
घरोघरी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले की, सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गातील मराठा नागरिकांसाठी जवळपास १८० प्रश्न आहेत, तर खुल्या प्रवर्गातील इतर जातींसाठी ७५ ते ८० प्रश्न आहेत. दोनच दिवस झाले आम्ही सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात केली आहे. यात घर शोधण्यात वेळ जातो, नागरिक फारसा प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे दिवसाला केवळ २५ ते ३० घरे होत आहेत. आम्ही आर्थिक अंदाज घेऊन मराठा वगळून इतर जातीच्या नागरिकांना मोघमच प्रश्न विचारात आहोत आणि काही प्रश्नांवर स्वत:च ‘नाही’ म्हणून टीक करीत आहोत. तरच आमचे काम पूर्ण होऊ शकणार आहे.
महापालिकेचे २,००० कर्मचारी; त्यातील ४०० शिक्षक :
मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी महापालिकेचे २,००० कर्मचारी नियुक्त केले आहेत. यात ४०० शिक्षकांचा समावेश आहे.