लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर बाह्यवळण येथील बेडशिंग रस्ता ते पायल सर्कलपर्यंत ( किमी १४१/४५० ते किमी नं. १४२/६००) पर्यंतच्या महामार्गावर लगत सेवा रस्ता करण्यात यावा यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सरडेवाडी येथे टोल बंद आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पथकाने नगरसेवक पोपट शिंदे यांच्यासोबत सेवा रस्त्याबाबत सर्वेक्षण केले. दोन दिवसांत कामाला सुरुवात करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इंदापूर शहरातील बाह्यवळण रस्त्याला शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे. त्याला मागील दहा वर्षांपासून अधिक कालावधी लोटला. शेतमाल वाहतुकीसाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. नगरसेवक पोपट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मेंटेनन्स मॅनेजर अमर सपाटे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक माने साहेब, सहायक मॅनेजर सुनील तिवारी यांनी सेवा रस्त्यासाठी जागेची पाहणी केली.
या वेळी अधिकारी यांनी अधिग्रहण केलेल्या जागेत उगवलेल्या झाडांची पाहणी केली. यात फळझाडे, बाबळ, इतर पिके यांची सविस्तर नोंद करून घेतली. दोनच दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहोत, असे अधिकारी यांनी सांगितले.
चौकट : काही ठिकाणी जागा अपुरी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे
इंदापूर शहरालगत असणाऱ्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या शहराकडील बाजूस बेडशिंगे रोड ते पायल सर्कल ( देशपांडे व्हेज ) पर्यंत सेवा रस्त्यासाठी जमिनी अधिग्रहन केलेल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी शेतकरी यांचे अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण हटविण्यासाठी शेतकऱ्यांनी मदत केल्यास, सेवा रस्ता तत्काळ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, अशी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
फोटो ओळ : इंदापूर येथे बेडशिंगे रोड ते पायल सर्कलपर्यंत रस्त्याचे सर्वेक्षण करताना अधिकारी व नगरसेवक पोपट शिंदे.