पुणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार पालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमध्ये साडेपाच लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येला आता पालिकेकडून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या गावांमधील पाण्याच्या आवश्यकतेसंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आजमितीस या गावांमध्ये दरडोई-दरमाणशी ५५ लिटर पाणी दिले जात आहे.
समाविष्ट २३ गावांमधील तीन गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो. यासोबतच अन्य ८ गावांना ‘बल्क मीटर’द्वारे महापालिकेकडून पाणी पुरविले जाते. उर्वरित गावांमधील पाण्याचे स्रोत काय आहेत, विहिरी अथवा किती टँकरद्वारे किती प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो याबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या गावांमधील लोकसंख्या, गावांना होणारा पाणीपुरवठा, प्रत्यक्षातील निकड आणि पालिकेची तयारी यासंदर्भात सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पाणी पुरवठ्यासाठी वाहिन्या टाकणे, त्यासाठी आवश्यक तरतूद याचाही विचार करावा लागणार आहे. तूर्तास गावांमध्ये ५५ लिटर प्रतिमाणशी पाणी देण्याचा निकष असल्याने त्याप्रमाणे पाणी दिले जाईल असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.