लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पीएमपी प्रशासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मद्तीने ट्रान्सपोर्ट फॉर ऑल हा सर्व्हे करणार आहे. यात विद्यापीठाचे विद्यार्थी शहरातील विविध भागांत फिरतील. लोकांशी संवाद साधतील. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिक कोणत्या साधनांचा वापर करतात, त्यात त्यांना कोणत्या अडचणी येतात किंवा जे नागरिक वाहतुकीसाठी सार्वजनिक साधनांचा वापर का करत नाही, या कारणांचा शोध घेऊन त्याचा सविस्तर अहवाल पीएमपी प्रशासनला सादर करणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी १० दिवस फिरून, नागरिकांशी संवाद साधून हा सर्व्हे करतील. येत्या काही दिवसातच सर्व्हेला सुरुवात होईल. सर्व्हे पूर्ण झाल्यावर त्याचा सविस्तर अहवाल पीएमपी प्रशासनाला सादर करतील. त्या नंतर पीएमपी प्रशासन सूचनांचा विचार करून योग्य तो निर्णय घेणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतिल त्रुटी दूर करून ती अधिक बळकट व्हावी या करीता हा सर्व्हे केला जाणार आहे.