याप्रसंगी आमदार संग्राम थोपटे, गुंजवणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, वेल्हा पंचायत समिती सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे,शिवसेना जिल्हा प्रमुख कुलदीप कोंडे,वेल्हा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष नानासाहेब राऊत, राष्ट्रवादीचे संतोष रेणुसे, शिवसेनेचे शैलेश वालगुडे, मनसेचे दिगंबर चोरघे,चंद्रकांत शेंडकर, शोभा जाधव,संदीप नगीने उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, या योजनांना मंजुरी मिळविण्यासाठी साधारणत: मागील चार ते पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून सर्वपक्षीय गुंजवणी संघर्ष समितीचे माध्यमातून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. यापूर्वीच्या सरकारने तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र कृष्णा खोरे महामंडळाने प्रकल्पात अतिरिक्त पाणीसाठा नसल्याचे कारण देत मान्यता देणे शक्य होणार नाही, असा अहवाल दिला होता. परंतु जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेकडे वारंवार बैठक घेऊन पाठपुरावा करून धरणाच्या फुगवट्यामधील राखीव असणाऱ्या ०.४३ टीएमसी पाण्याच्या कोट्यातून या तिन्ही प्रकल्पासाठी पाणी देता येणे शक्य असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर गुंजवणी प्रकल्पाच्या पाणी नियोजनात कोणताही बदल न करता या वांगणी खोरे, वाजेघर खोरे व शिवागंगा खोरे या तीनही उपसासिंचन योजनांना मान्यता देण्यात आली. यामध्ये साधारणत: ३२ गावांतील २५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या भागातील शेतकरीवर्गाला शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरिता कायमस्वरूपी लाभ होणार असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.
वाजेघर व वांगणी परिसरातील नागरिकांनी सर्वेक्षण करण्यास मदत करुन योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य करावे.
संग्राम थोपटे, आमदार
गुंजवणी पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून वाजेघर व वांगणी परिसरात पाणी आणण्यासाठी समितीने केलेल्या संघर्षाला मोठ्या प्रमाणात यश आले आहे.
दिनकर धरपाळे - अध्यक्ष, गुंजवणी पाणी संघर्ष समिती
१९ मार्गासनी
वाजेघर येथील गुंजवणी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची सुरुवात आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आली.