पुणे : जमिनीची मोजणी करून देण्याचा माेबदला म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापकाला रंगेहाथ पकडले.
प्रशांत मोहन कांबळे (भूकरमापक वर्ग ३) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई शिरूर येथील भूमी अभिलेखाच्या कार्यालयाच्या आवारात पथकाने केली आहे.
याबाबत एका ५३ वर्षांच्या व्यक्तीने तक्रार दिली. तक्रारदार यांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्या वेळी प्रशांत कांबळे याने त्यांच्याकडे जमीन मोजणी करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची मोबदला म्हणून मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची सोमवारी पडताळणी केली असता, कांबळे याने लाच मागितल्याचे समोर आले. त्यानुसार लाचलचुपत प्रतिबंधक पथकाने सोमवारीच कार्यालयाच्या आवारात सापळा लावला होता. त्यावेळी ५ हजाराची लाच घेताना कांबळेला पकडले. याप्रकरणी कांबळे याच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.