पिंपरी : चिंंचवडगावातील नदी परिसरात सापडलेल्या चित्रबलाक पक्ष्यावर उपचार करून त्याचे प्राण वाचविले आहे. चिंचवडगावच्या गिर्यारोहक सुरेश निंबाळकर, सर्पमित्र शुभम पांडे आणि गजानन मितकरी यांनी प्राण वाचवले. चिंचवडगावातील नदीजवळील पांढरीच्या मळा येथे शुक्रवारी जखमी पक्षी सापडला. वस्तीजवळ सापडलेला या पक्ष्याला बघण्यासाठी गर्दी जमली होती. आकारात मोठा असलेला पक्षी म्हणून नागरिकांना मोबाइलने फोटो काढण्याचे सुरु केले होते. गर्दी मोठी जमली म्हणून जवळच राहणारे गिर्यारोहक सुरेश निंबाळकर आणि तिथून चाललेले शुभम पांडे आणि गजानन मितकरी हे दोघे सर्पमित्र काय गोंधळ आहे पाहायला गेले असता समोर जखमी पक्षी दिसला. कोणी त्याला वाचवण्याचा विचार न करता सारे ह्यफोटोसेशनह्णमध्ये रमले होते. यातून त्या पक्ष्याची सुटका करण्यासाठी निंबाळकर, पांडे आणि मितकरी यांनी काळजीपूर्वक त्या पक्ष्याला पकडले. या पक्ष्याला प्रथम त्यांना ओळखता आले नाही. या पक्ष्याच्या दोन्ही पंखांवर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. बहुधा भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यामुळे जखमी झाला असावा. निंबाळकर यांनी चिंचवड येथील बहिणाबाई प्राणिसंग्रहालयात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांच्याकडे नेले. डॉ. गोरे यांनी पक्ष्यावर उपचार केले. तिथे पक्ष्याला ठेवायची व्यवस्था नसल्यामुळे वन विभागकडे पुन्हा रिक्षातून नेण्यात आले. कोणताही वन्यजीव सापडल्यास नियमानुसार ४८ तासांत वन विभागाला कळवणे बंधनकारक आहे. तिघांनी चित्रबलाकला कात्रजच्या अनाथालयाकडे जाऊन सुपूर्द केले आहे.
पक्षिमित्रांनी वाचवले ‘चित्रबलाक’चे प्राण
By admin | Published: January 02, 2017 2:07 AM