लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केरळमध्ये ३ जूनला आगमन झाल्यानंतर मॉन्सूनने गेल्या दोन दिवसांत वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. नैर्ऋृत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण कोकणातील हर्णेपासून सोलापूरपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने शनिवारी जाहीर केले आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात इतक्या लवकर मॉन्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. गेल्या वर्षी दक्षिण कोकण, कोल्हापुरात ११ जून रोजी मॉन्सून दाखल झाला होता.
मॉन्सून शनिवारी हर्णे, सोलापूर, रायचूर, तिरुपती, कुडलोरपर्यंत दाखल झाला. येत्या २४ तासांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि तमिळनाडूचा उर्वरित भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़
केरळमध्ये ३ जून रोजी आगमन झाल्यानंतर त्याने शुक्रवारपर्यंत कर्नाटकातील कारवारपर्यंत मॉन्सूनने वेगवान वाटचाल केली होती. आज त्यात आणखी प्रगती केली असून गोव्यासह कोकणातील हर्णे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व लगतच्या मराठवाड्यातील काही भागापर्यंत मजल मारली आहे.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या वेळांनुसार दक्षिण कोकण ७ जून, कोल्हापूर ९ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र, मॉन्सून एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. तिने निर्धारित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.
पुढील ७ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी सांगितले की, मॉन्सूनने आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. सर्वसाधारणपणे मॉन्सून १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. यंदा तो काही दिवस अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी ते दक्षिण केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे कोकणासह या ६ जिल्ह्यांत गेले दोन दिवस सर्वदूर पाऊस झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
येत्या २४ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रातील आणखी काही भागांत मॉन्सून पुढे वाटचाल करेल, अशी शक्यता आहे.
मुंबई, पुण्यात मॉन्सून कधी?
आज रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत पाऊस झाला आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ येथे आज पावसाचा शिडकावा झाला. जर येत्या २४ तासांत मुंबई, पुणे येथे चांगला पाऊस झाला, तर मॉन्सून या भागात आला असे म्हणता येईल. या दोन दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. जर येत्या ४८ तासांत अपेक्षित इतका पाऊस झाला नाही तर मुंबई, पुण्यात मॉन्सूनच्या आगमनाला ६ ते ७ दिवस लागू शकतात. मुंबई, पुण्यात मॉन्सूनच्या आगमनासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल, असे कश्यपी यांनी सांगितले.
शनिवारी सकाळी संपलेल्या २४ तासात देवगड २७, सोलापूर २५, परभणी ६, चंद्रपूर ८, ब्रम्हपुरी २२, नाशिक १५, मालेगाव ४, जळगाव ३, पुणे ६, लोहगाव १२, पाषाण ७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ३, लोहगाव ३४, कोल्हापूर २, नाशिक २, सांगली १, सोलापूर १, पणजी ३, डहाणू ६, अमरावती १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून वारे ताशी ३० ते ४० वेगाने वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नंदुरबार, जळगाव, नांदेड, सिंधुदुर्ग, मुंबई हे जिल्हे वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.