पुणे : आमदार संजय शिरसाट यांच्याविरूद्ध शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी शिरसाट यांच्या विरोधात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी समन्स बजावले असून, येत्या 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहून दाव्याला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधारे यांनी पुणे पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर शिरसट यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाबाबत सुषमा अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसांत खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी अँड. तौसिफ शेख व अँड क्रांतीलाल सहाणे यांमार्फत शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला. दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असे नमूद केले आहे. शिरसाट यांना न्यायालयाने समन्स काढले असून, 13 जुलै रोजी न्यायालयात हजर राहावे आणि बचावासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत. आधीच कळविल्याप्रमाणे यादिवशी तुम्ही हजर राहू शकला नाही तर तुमच्या गैरहजेरीतही खटल्याची सुनावणी होईल असे सूचित करण्यात आले आहे. अंधारे यांचे वकील अँड. तौसिफ शेख व अँड क्रांती सहाणे, अँड स्वप्नील गिरमे, अँड. दीपक गायकवाड, अँड कौसर शेख, अँड शिवानी गायकवाड, अँड सूरज जाधव आणि अँड महेश गवळी यांनी याप्रकरणात काम पाहिले.