पुणे : शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांची बदनामी करणाऱ्या वाघमारेंना ५ कोटी रुपये नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.
अंधारे यांनी बीडच्या वाघमारेंना ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रिया आवले आणि ॲड. बाळकृष्ण निढाळकर यांच्यामार्फत ही नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, आपण अंधारे यांच्याबाबत अनेक अपमानास्पद उल्लेख केले आहेत. काही प्रत्यक्ष घडलेल्या घटना जसे की तत्कालीन बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले. या वस्तुस्थितीभोवती अनेक काल्पनिक आरोप करून सुषमा अंधारे यांची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपण जी वक्तव्य केली आहेत त्यासाठी ठोस पुरावे सादर करावेत. ही अपमानास्पद वक्तव्ये मागे घ्यावीत, लेखीनाम्याची प्रत आम्हाला पाठवावी अन्यथा आम्ही ५ कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करू, तसेच ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत उत्तर पाठवावे.
याशिवाय गुगल आणि यूट्यूबलासुद्धा नोटीस पाठवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून बदनामीकारक व स्त्रीत्वाचा अपमान करणारा मजकूर, व्हिडीओ काढून टाकावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.