पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळचा खून करताना प्रत्यक्ष जागेवर असणाऱ्या आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात असणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली आहे.
अभिजित अरुण मानकर (३१, रा. दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इतर आरोपींच्या मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणातून अभिजित मानकर हा आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. ५ जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शरद मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी खून केला होता. याप्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाइलचे क्लोन करण्यात आले असून, त्यात १९ हजार ८२७ ऑडिओ क्लिप, रेकॉर्डिंग मिळवून आले आहे. यातील १० हजार क्लिपचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, यातील ६ क्लिप या शरद मोहोळ खून प्रकरणाशी संदर्भात आहेत. यातील ६ क्लिपमध्ये शरद मोहोळचा खून करताना प्रत्यक्ष जागेवर असणाऱ्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात अभिजित मानकर होता. आरोपी अभिजित मानकरची आठव्या दिवशी चौकशी केल्यानंतर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. उद्या (दि. ७) अभिजित मानकरला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले आणि गणेश मारणे हे ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.