शेलपिंपळगाव: शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील पैलवान नागेश कराळे (nagesh karale murder case) हत्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. शिवकांत शिवराम गायकवाड (वय ४३, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. नागेश कराळे हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार योगेश बाजीराव दौंडकर व अन्य तीन ते चार जण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
तत्पूर्वी, शेलपिंपळगाव येथे गुरुवारी (दि.२३) रात्री नागेश कराळे आपल्या जीपमध्ये बसत असताना कारमधून आलेल्या तीन ते चार आरोपींनी कराळे यांच्यावर पिस्तूलातून आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याप्रकरणी गिरीश बाळासाहेब कराळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदर प्रकरणाची पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली उपआयुक्त मंचक इपर, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, क्राईमचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे व अन्य पोलीस पथकाकडून कसून तपास सुरू आहे. दरम्यान शेलपिंपळगाव येथील सर्व व्यवहार शनिवारी सुरू झाले. मात्र परिसरात पोलिसांची गस्त कायम असून खबरदारी म्हणून बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गावासह परिसरातील सूत्रांकडून संबंधित माहिती मिळवून पोलिस तपास जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.