पुणे : माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपावरून अटक करण्यात आलेल्या नागपूर विद्यापीठातील प्राध्यापिका शोमा सेन यांचा जामीन अर्ज शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांनी फेटाळून लावला.पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांत आरोपींनी बंदी घालण्यात आलेली संघटना सीपीआय माओवादी यांच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचा आणि विविध कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग तपासात दिसून आला आहे. प्रथमदर्शनी आरोपीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निर्दशनात येते. सध्या तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.न्यायालयाने गेल्या आठवड्यात नजरकैदेत असलेल्या व्हर्णन गोन्साल्वीस, अॅड. सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे गोन्साल्वीस, फरेरा आणि अॅड. भारद्वाज यांना अटक करण्यात आली असून ते ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. तर अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर उद्या (शनिवार) निर्णय होणार आहे. या प्रकरणातील आरोपींनी केलेले कृत्य समाजाला धक्का पोहचविणारे असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एमआय फोर या हत्याराच्या चार लाख राऊंडसाठी आठ कोटी रुपयांचा वार्षिक पुरवठ्याचा उल्लेख आहे. भूमिगत माओवादी कार्यकर्ते प्रकाश यांच्या २५ सप्टेंबरच्या पत्रात कांदुलनार, बसगुडा परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि रस्ता खुले करण्यासाठी वायर, खिळे, नायट्राइट पावडर यांचे नियोजन करणे यावरून माओवाद्यांचा प्लॅन लक्षात येतो. आरोपींनी देशाच्या एकता, एकात्मता, सुरक्षा, सार्वभौमात्वाला धक्का पोहोचविण्याचे कृत्य केले, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.गडलिंग यांना मिळणार उबदार कपडेअॅड. गडलिंग यांनी रंगीत पेन्सिल, रुमाल, पुस्तके, फोल्डर, बेडशीट, डिक्शनरी आणि न्यायालयाचे काही निकाल मिळण्याबाबत अर्ज केला होता. हे सर्व अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आणखी काही उबदार कपडे पुरविण्यात येणार आहेत. पेन्सिलला धार लावण्यासाठी लागणारे शार्पनर कारागृह प्रशासनाकडे ठेवण्यात येईल. गरज असेल तेव्हा ते त्यांना पुरविण्यात येणार आहे.
संशयित माओवादी प्रकरण: प्रा. शोमा सेन यांचा जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 1:24 AM