पुणे :कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिरातील एका लोखंडी पाईपला एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे आढळून आले. शवविच्छेदनानंतर त्यांच्या डोक्यामध्ये अंतर्गत जखमा आढळून आल्या असून गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून केल्यानंतर दोरीच्या सहाय्याने लटकवून आत्महत्या असल्याचे भासविण्यात आल्याचा पोलिसांना सशंय आहे. प्रकाश किसन जाधव (वय ४२, रा. सुधामातानगर, कात्रज) असे खून झालेल्या नागरिकाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक नंदलाल हरिश्चंद्र भादले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ ते ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जाधव हे बिगारी काम करीत होते. त्यांना २ मुले, सुना, पत्नी आहेत. लक्ष्मी माता मंदिराला लागूनच त्यांच्या २ -३ खोल्या आहेत.
याबाबत पोलीस निरीक्षक संगिता यादव यांनी सांगितले की, शुक्रवारी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान जाधव यांच्या घरच्यांना त्यांनी मंदिराच्या आत एका लोखंडी पाईपला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी जाधव यांना तातडीने खाली उतरविले. परंतु, त्यांचा मृत्यु झाला होता. ही बाब पोलिसांना समजल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला.
शवविच्छेदनात त्यांचा गळा दाबून तसेच त्यांच्या डोक्यामध्ये अंतर्गत जखमा करुन त्यांना जीव मारल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यामुळे त्यांना मारल्यानंतर दोरीच्या सहाय्याने लोखंडी पाईपाला लटकावून त्यांनी गळफास घेतल्याचा बनाव केल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानुसार पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संगिता यादव तपास करीत आहेत.