पुणे - कात्रज येथील संतोषनगरमध्ये राहणा-या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद असल्याने ब्ल्यु व्हेल गेममधून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्याकडे असणारे चार मोबाईल लॉक असल्याने ते उघडल्यानंतरच तो नेमक्या कोणत्या गेम खेळत होता, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
युसूफ याकुब शेख (वय २४, रा़ संतोषनगर, कात्रज) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी आकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,युसुफ शेख याच्या वडिलांची कांढवा, कात्रज, संतोषनगर येथे भंगार वस्तूची ४ दुकाने आहेत़ त्यामध्ये तो वडिलांना मदत करीत असे.
युसूफ याच्याकडे चार अँड्राइंड मोबाईल होते. रात्री घरी आल्यावर तो उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद होता. वेगवेगळे मोबाईल बाळगण्याचा त्याला शोक होता़ इतरांनाही तो बाजारात नवीन आलेले मोबाईल विकत घेऊन देत असे. त्याच्या मित्रांनाही त्याच्या या नादाची माहिती होती़ त्याचा नुकताच विवाह ठरला होता.
जगभरात ब्ल्यु व्हेल मोबाईल गेम खेळणा-यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यात अनेक जण खेळातील टाक्स पूर्ण करण्यासाठी आपल्या शरिरावर जखमा करुन घेत असत. शनिवारी रात्री तो नेहमीप्रमाणे टेरेसवरील आपल्या खोलीमध्ये गेला होता़ तो नेहमी सकाळी ११ ते १२ वाजता उटायचा, रविवारी दुपार होऊन गेली तरी तो न उठल्याने घराच्यानी खोलीचा दरवाजा ठोठावला़ तरीही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पत्र्याचा दरवाजा वाकवून आत पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलिसांना कळविले़ पोलिसांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला़ पोलिसांना खोलीमध्ये कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही़ भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत. ब्ल्यु व्हेल गेमचे टाक्स पूर्ण करताना अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये या मोबाईल गेमवर बंदी घालण्यात आली आहे़ भारतातही या गेमवर बंदी घालण्यात आली आहे.
याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी़ एस़ अहिवळे यांनी सांगितले की, युसूफ शेख याचे नुकतेच लग्न ठरले होते़ तो गेल्या काही दिवसांपासून निराश वाटत होता, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे़ त्याला गाड्यांचा ही शौक होता. त्याने नुकतीच बुलेट गाडी घेतली होती़ अत्यंसस्कारानंतरचे धार्मिक विधीसाठी त्याचे नातेवाईक बाहेर गेले असल्याने त्यांच्याकडून आणखी माहिती घेता आलेले नाही. युसूफ याच्या उजव्या पायावर ८ ते १० जखमांच्या खुणा होत्या़ त्या कंपासमधील करकटासारख्या वस्तूने केलेल्याअसाव्यात़ मात्र, या जखमा जुन्या होत्या.
त्याच्याकडील चारही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ते लॉक आहेत़ तज्ञांमार्फत शुक्रवारी ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करणार असून त्यानंतर तो नेमका कोणते गेम खेळायचा याची माहिती मिळाल्यावरच त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.