पुणे : ठाणे आणि कळवा या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून पुढे सरकत होते. त्यावेळी भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद या त्यांच्या वाटेत आल्या. तेव्हा आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप रिदा रशीद यांनी केला आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आव्हाड यांना निलंबित करा, अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांना केली आहे.
बावनकुळे म्हणाले, तो व्हिडीओ पाहा, राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादीने निलंबन करायला हवं. तसेच, अशा घटना होत राहतात अस बोलणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करावा अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे. यासोबतच आमदार राजनामा द्यायचा असेल तर द्या, अजित पवार शरद पवार राजनामा घेणार का? असा सवाल उपस्थित करत आव्हाड याचं निलंबन करा अशी विनंती केली आहे.
भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. आव्हाड यांनी 'तू इथं काय करतेस' असे म्हणत मला हात लावून बाजूला केले. असा आरोप रशीद यांनी ट्वीट केला आहे.