पिंपरी : अवैध बांधकामांचा शास्तीकर शंभर टक्के रद्द करावा, अशी या मागणी करणारे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह चार नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेत ‘सुरक्षा रक्षकांनी गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर घेऊन जावे, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी सर्वसाधारण सभेत आज दिले. गेल्या पस्तीस वर्षांत पहिल्यांदाच सुरक्षारक्षक सभागृहात पाचारण करण्यात आले. सुरक्षा रक्षक सभागृहात येऊन संबंधितांना बाहेर घेऊन गेले. निलंबन अन्यायकारक असल्याने राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेने एकजूट केली असून, शास्तीकर शंभर टक्के माफ करावा, अशी मागणी केली. ‘कोणत्याही परिस्थितीत निलंबन मागे घेणार नाही, अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. निलंबित केलेल्यांमध्ये विरोधी पक्षनेते बहल यांच्यासह माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने, मयूर कलाटे यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता आल्यानंतर कामकाजाची पहिली सभा आज झाली. विषयपत्रिकेवर शास्तीकराचा विषय होता. सहाशे स्क्वेअरफुटापर्यंतच्या बांधकामांना पूर्ण शास्ती माफ आणि त्यापुढील घरांना शास्ती आकारावी असा विषय होता. त्या वेळी सत्तारूढ भाजपाच्या सदस्यांनी राज्यातील नेत्यांची आणि स्थानिक आमदारांचे अभिनंदन करीत हा निर्णय किती चांगला आहे, हे पटवून दिले. तसेच माई ढोरे यांनी हजार स्क्वेअरफुटापर्यंतच्या बांधकामांना शास्ती लावू नये, अशी उपसूचना दिली. या वेळी झालेल्या चर्चेत ‘हा कर जिझीया कर असून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण राज्यसरकारने मंजूर केले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांची शास्ती रद्दच होणार आहे. त्यामुळे नवा विषय कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून शास्ती ही शंभर टक्के रद्द व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अजित गव्हाणे, दत्तात्रय साने, प्रमोद कुटे, नीता पाडाळे यांनी केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, राज्य सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले पहिजे. परंतु, आणखी किती दिवस चुकीच्या गोष्टी होऊ द्यायच्या, त्या थांबवायला हव्यात. गरजेपेक्षा अधिक घरे बांधणाऱ्यांना माफी देऊ नये, अशी आमची भूमिका आहे.’’ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शास्तीप्रश्नाचे राजकीय भांडवल केले जाऊ नये. लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. ’’ याच वेळी माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी ‘शंभर टक्के शास्ती माफीची उपसूचना घ्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, विरोधी पक्षाच्या उपसूचनेचा विचार न करता माई ढोरेंची उपसूचना स्वीकारून शास्तीचा विषय मंजूर करण्यात आला. त्यामुळे विरोधी पक्षातील सदस्य खवळले. बहल, साने, कदम यांच्यासह सर्वच सदस्य महापौरांच्या आसनाजवळ गेले. मतदानाची मागणी केली. विरोधकांची मागणी का नोंदवून घेतली नाही, याबाबत जाब विचारला. ‘संबंधित विषय मंजूर झाला आहे. त्यामुळे याविषयावर विरोधी मत नोंदवून घेता येणार नाही. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर शेरेबाजी सुरू केली. अशा गोधळात पहिली, दुसरी सभेचे कामकाज सुरू होते. दत्ता साने यांनी महापौराच्या डायस समोरील कुंडी आपटली. त्याच वेळी महापौरांचा मानदंड पळवू नये, म्हणून सत्ताधारी नगरसेवक पुढे गेले. (प्रतिनिधी)
विरोधी पक्षनेत्यांसह चौघे निलंबित
By admin | Published: April 21, 2017 5:57 AM