पुणे : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेले अमरावती विभागाच्या नगर रचना विभागाचे निलंंबित सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५५, रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड) याना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने महाबळेश्वर येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. बनावट दस्तऐवजाच्या आधारे पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या परिसरात फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर गेल्या एक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई याठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. नाझीरकर याला अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी एक खास पथक तयार केले होते. या पथकाने पुणे, सातारा जिल्ह्यातील आरोपीच्या वास्तव्याची ठिकाणे सीसीटीव्ही फुटेजस तपासणी करीत होते. त्यावेळी नाझीरकर हा महाबळेश्वर परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेथे शोध घेतल्यावर महाबळेश्वरमधील नाकिंदा परिसरात तो आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.फळविक्रेत्याचा फळे विक्रीचा सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा खोटा दस्त करारनामा करुन फसवणूक केल्याप्रकरणी नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांची पत्नी संगीता नाझीरकर, मुलगी गीतांजली नाझीरकर, मुलगा भास्कर नाझीरकर अशा ६ जणांवर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात २१ मार्च रोजी ग्रामीण पोलिसांनी मुलगा भास्कर नाझीरकर याला अटक केली होती.दत्तवाडी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच नवी मुंबईतील ए. पी. एम. सी. पोलीस ठाण्यातही एक फसवणुकीचा गुन्हा २०२१मध्ये दाखल करण्यात आला आहे. त्याअगोदर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची अधिक संपत्ती आढळून आल्याने नाझीरकर यांच्याविरुद्ध जून २०२० मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याची माहिती नगर विकास विभागाला कळविल्यानंतर तब्बल ९ महिन्यांनंतर नगर विकास विभागाने १० मार्च २०२१ रोजी हनुमंत नाझीरकर यांना निलंबित केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, प्रमोद नवले, सचिन गायकवाड, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, महेंद्र कोरवी यांनी केली आहे.
नगर रचना’चे निलंबित हनुमंत नाझीरकर पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 9:01 PM