पुण्यातील भाजपा-काँग्रेसच्या उमेदवारीवरील पडदा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:44 AM2019-03-17T01:44:27+5:302019-03-17T01:44:50+5:30
लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीवरील पडदा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांच्या दिल्लीत बैठका सुरू असून, अद्याप पुण्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नाही.
पुणे - लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीवरील पडदा अजूनही कायम आहे. दोन्ही पक्षांच्या दिल्लीत बैठका सुरू असून, अद्याप पुण्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचे सगळे इच्छुक दिल्लीत ठाण मांडून बसले असून, भाजपाचे इच्छुक मात्र पुण्यातच दिसत आहेत.
राजकीय वर्तुळाशिवाय सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही या दोन्ही प्रमुख पक्षांच्या पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराविषयी उत्सुकता आहे. काँग्रेसकडून भाजपाचे सहयागी खासदार संजय काकडे, संभाजी ब्रिगेड व शेतकरी कामगार पक्षाचे राज्य पदाधिकारी प्रवीण गायकवाड तसेच माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड हे इच्छुक आहेत. हे चौघेही शुक्रवारी रात्रीत दिल्लीकडे रवाना झाले. शनिवारी दुपारी ४ वाजता दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची बैठक सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पुण्यातील उमेदवारीबाबत काहीही चर्चा झाली नाही.
भाजपाच्या निवड समितीचीही शनिवारी दिल्लीत बैठक होणार असल्याची माहिती येथील कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र बैठकीचा तपशील दिला गेला नाही. भाजपाकडून पुण्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट या दोघांची नावे प्राधान्याने घेतली जात आहेत. त्याशिवाय पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचेही नाव नवा चेहरा म्हणून चर्चेत आहे. तसेच शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही लोकसभेसाठी पक्षाने उमेदवारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपातही चुरस आहे.
या दोन प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांची मतदारसंघात रोज चर्चा सुरू आहे. कोणासमोर कोण टिकेल, कोण भारी पडेल, कोणाला मतदान होणार नाही, कोणाला जास्त मतदान मिळेल यावर चौकांचौकांमध्ये चर्चा झडत आहेत. दोन्ही पक्षांनी नावाबाबत गुप्तता बाळगली आहे. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार पाहून नंतर नाव निश्चित करायचे असा विचार पक्षाचे नेते करत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आता शनिवारी तसेच रविवारीही नाव जाहीर होणार नाही, थेट येत्या सोमवारीच दोन्ही पक्ष नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.
उमेदवार जाहीर होईनात
उमेदवार जाहीर होत नसले तरी दोन्ही पक्षांच्या संघटनात्मक स्तरावर मात्र पक्षाचे काम जोरात सुरू आहे. मतदान केंद्रांवरील कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या, त्यांच्या बैठका, त्यांना मार्गदर्शन, निवडणूक आयोगाच्या सूचना, प्रचाराच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना असे दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका होत आहेत.