बारामती : बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा निवडणुकीचे पक्षाचे उमेदवार अशोक अजिनाथ माने यांना मारहाण करून काळे फासुन बारामती आमराई परिसरात धिंड काढली. मंगळवारी (दि. २२) ही धिंड काढण्यात आाली. बसपाचे उमेदवार माने यांनी प्रामाणिकपणे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा बसपा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. याच रागातुन माने यांच्या तोंडाला काळे फासुन कपडे फाडुन धिंड काढल्याचा प्रकार दुपारी घडला आहे. बारामती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात बसपाच्या वतीने अशोक माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.निवडणुक काळात त्यांचा बारामती शहरासह अन्य भागात ही त्यांचा प्रचार सुरू होता. मात्र, मतदानापुर्वीच बसपचे उमेदवार अशोक माने यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, माने यांनी वरिष्ठ नेत्यांना कोणतीही कल्पना न देता हे प्रसिद्ध पत्रक काढल्यामुळे त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, याप्रकरणी उमेदवार माने यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.त्यांची फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
बारामतीत बसपाच्या उमेदवाराची काळे फासुन काढली धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 8:58 PM
बारामती विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात बसपाच्या वतीने अशोक माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
ठळक मुद्देवरिष्ठ नेत्यांना कोणतीही कल्पना न देता ' हे ' प्रसिद्ध पत्रक काढल्यामुळे त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई