पूजा आनंद यांच्यावर निलंबनाची कारवाई; ऐन प्रचाराच्या काळात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी संगीता तिवारी
By राजू इनामदार | Published: November 12, 2024 06:16 PM2024-11-12T18:16:49+5:302024-11-12T18:17:52+5:30
प्रदेश समितीला कळवल्यानंतरही कारवाई होत नसल्याने ऐन प्रचाराच्या काळात महिला आघाडीला शहराध्यक्षच नाही, अशी काँग्रेसची स्थिती झाली होती
पुणे : काँग्रेसच्यामहिला आघाडी शहराध्यक्षपदी संगीता तिवारी यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी तसे पत्रही दिले. आधीच्या शहराध्यक्ष पूजा आनंद यांच्यावर अखेर प्रदेश शाखेने निलंबनाची कारवाई केली आणि तिवारी यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले.
पूजा आनंद यांचे पती मनीष आनंद शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. अर्ज मागे घेण्याबाबत सांगूनही त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले. महिला आघाडीच्या शहराध्यक्ष असलेल्या त्यांच्या पत्नी पूजा आनंद यांच्यावर मात्र कारवाई होत नव्हती.
काँग्रेसच्या शहर शाखेतील पदाधिकारी त्याबाबत आग्रही होते. प्रदेश समितीला कळवल्यानंतरही कारवाई होत नसल्याने ऐन प्रचाराच्या काळात महिला आघाडीला शहराध्यक्षच नाही, अशी काँग्रेसची स्थिती झाली होती. अखेर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या पत्रामुळे पूजा आनंद यांच्यावर कारवाई झाली, त्याचबरोबर संगीता तिवारी यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. संगीता तिवारी या प्रदेश महिला शाखेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्या शहरातील काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्या असून, महापालिका शिक्षण मंडळाच्या काही वर्षांपूर्वी अध्यक्ष होत्या.