मागील दीड वर्षात महाविकास आघाडी सरकार कोणत्याही प्रकारे विधायक कार्य करू शकले नाहीत. ह्या निराशेतून काल विधानसभेमध्ये जनतेच्या न्याय हक्कासाठी आग्रही असणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांना खोटारडेपणा करून महाविकास आघाडी सरकारने निलंबित केले, असे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे, शहर प्रभारी धीरज घाटे, महिला आघाडी अध्यक्षा अर्चना पाटील, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश पिंगळे, प्रमोद कोंढरे आदी सहभागी झाले होते.
केवळ दुष्ट हेतूने केलेली १२ आमदारांची निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घेऊन आरक्षणाच्या मुद्यावर भाजपच्या भूमिकेस तोंड देण्याची हिंमत सरकारने दाखवावी, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्य सरकारने १२ आमदारांचे केलेले निलंबन म्हणजे लोकशाहीचा खून करून हुकूमशाहीचेच दर्शन घडवले आहे यावेळी भाजपाने म्हटले. ठाकरे सरकारला ओबीसी आरक्षण देण्याची इच्छाच नाही. त्यामुळेच, केंद्राकडे इम्पिरिकल डाटा मागण्याचा कांगावा करून विधानसभेतही फसवा ठराव करण्याचा सरकारचा डाव होता. तो हाणून पाडण्यासाठी भाजपने वैधानिक मार्गाने सभागृहात आवाज उठवू नये यासाठीच हा लोकशाहीविरोधी कारवाई करण्यात आली, असा आरोप करण्यात आला.
----------------------------------
फोटो ओळ : महाविकास आघाडी विरोधात आंदोलन करताना भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपा कार्यकर्ते.