पुणे : पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसुली करण्यास राज्यशासनाने स्थगिती दिली आहे. त्याचा फायदा पुणे जिल्हयातील ६६ गावांना मिळणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची वसुली करण्यात येणार नाही आणि या शेतकऱ्यांना नव्यानेही पीक कर्ज मिळणार आहे. ही ६६ गावे शिरूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील आहेत. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा कालावधी एकाच वर्षांचा असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सातत्याने दुष्काळ आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली होती. पीक कर्ज घेऊन खरीपाची केलेली पेरणी पावसाअभावी जळून गेली आणि शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे पीक कर्जाची परतफेडक कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. त्यामुळे या वसुलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार कर्जाच्या वसूलीस शासनाने स्थगिती देण्याचा निर्णय गेल्या आठवडयात घेतला होता. पुणे जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांच्या कजार्चे पुनर्गठण करून नव्याने कर्ज उपलब्ध करून घेण्याकरिता संमतीपत्रासह संबंधीत बँकेशी अथवा संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामिण जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले आहे.
६६ गावांमधील पीक कर्ज वसुलीस स्थगिती
By admin | Published: April 26, 2016 1:30 AM