पुणे : जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये सहभागी होऊन बेकादेशीरपणे अधिक आर्थिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय चौकशीत आढळून आल्याने पोलीस हवालदार शैलेश जगताप आणि पोलीस नाईक परवेज जमादार यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे़. याबाबतचा आदेश अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी काढला आहे़. पर्वती येथील जमीन खरेदी विक्री प्रकरणात आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून शैलेश जगताप व परवेज जमादार यांना गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते़ त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली़. नीलमणी देसाईच्या पर्वती येथील जमीन व्यवहारामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन आपल्या पदाचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुरुपयोग केला़. देसाई यांना मदत करण्यासाठी ऋषिकेश बारटक्के याच्याकडून रोख रक्कम स्वीकारली़. तसेच लाईफ स्टाईल येथून ब्रॅडेड कपडे खरेदी केले़. बारटक्के हा गुन्हेगार आहे, हे माहिती असताना त्याच्याशी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संबंध ठेवले़. हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार असून पोलीस दलाच्या शिस्तीच्या विपर्यस्त आहे, असे आरोप दोघांवर ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते़.आपले भाऊ जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर मोका कारवाई केली़. त्यामुळे आपल्याला या प्रकरणात अडकविण्यात आल्याचा आरोप शैलेश जगताप यांनी केला होता़. या मोका प्रकरणात दीपक मानकर यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे.विभागीय चौकशीत दोघांनी बारटक्के याला भेटायला गेल्याचे मान्य करुन बातमीसाठी गेलो होतो, असे सांगितले़. कोणती बातमी याचा उल्लेख मात्र केला नाही़. विभागीय चौकशीत दोघांना दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता़. त्यानंतर अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी या प्रकरणाचे अवलोकन केले़. त्यांनी दोघांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली़ त्यांनी दोषारोप मान्य नसल्याचे सांगितले़. तथापि त्यांनी त्याचे बचावार्थ कारणे दाखवा नोटीसला दिलेल्या उत्तराव्यतिरिक्त कोणताही ठोस पुरावा सदर केला नाही़. अगर नवी मुद्दा उपस्थित केला नाही़. त्यानंतर शुक्रवारी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी शैलेश जगताप आणि परवेश जमादार यांना खात्यातून बडतर्फ करण्याचा आदेश काढला आहे.शैलेश जगताप यांचे खबऱ्यांचे मोठे जाळे असून आतापर्यंत त्यांनी बेकायदा पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या १५० हून अधिक गुन्हेगारांना पकडून दिले आहे़. तसेच अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक नायजेरियन तरुणांना अमली पदार्थासह पकडून दिले असून त्यांना त्याबद्दल अनेक बक्षिसे मिळाली होती़. परवेज जमादार यांनीही अनेक गुन्हे उघडकीस आणले असून त्याबद्दल त्यांना वेळोवेळी बक्षिसे देण्यात आली होती.
पोलीस हवालदार शैलेश जगताप, परवेज जमादार खात्यातून बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 12:16 PM