बारामती: काटेवाडी(ता.बारामती) येथील तलाठ्याने विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठ्याने शेतकऱ्याला लाच मगितल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनुषंगाने बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांनी संबंधित व्हिडीओची पाहणी करीत तलाठ्यावर चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.
गावातील तलाठी महेश मेटे यांनी शेतकऱ्याकडे २० हजारांची मागणी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विकास धायगुडे हे आपल्याला विहिरीची नोंद सातबाऱ्यावर व्हावी यासाठी तलाठी ऑफिसला खेटे मारत होते. परंतु तलाठी मेटे यांनी त्यांच्याकडे २० हजारांची मागणी केली. त्याबदल्यात विकास धायगुडे यांनी तलाठी मेटेंना विहिरीची नोंद सातबाऱ्यावर व्हावी यासाठी १० हजार रुपये दिले , त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये तलाठी पैसे मोजताना दिसत आहेत. तसेच मला वरही पैसे द्यावे लागतात, पण ठीक आहे .मी करून घेतो असा संवाद ऐकु येत आहे.
काटेवाडी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव आहे. त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. प्रशासनामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा मोठा दरारा आहे. परंतु त्यांच्याच गावातील तलाठ्याने लाच घेतल्याने त्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
तहसिलदार विजय पाटील यांनी सांगितले कि, काटेवाडी येथील तलाठ्याचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्या अनुषंगाने व्हीडीओची प्राथमिक तपासणी करण्यात आली.यामध्ये काही संशयास्पद बाबी आढळल्या.व्हीडीओतील चित्रीकरणाच्या अनुषंगाने तलाठ्यांना विचारणा केली. यामध्ये नोंदीच्या बाबत जे कामकाज होणार होते, प्रथमदर्शनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक नियमाचा भंग केल्याचे दिसत असल्याने तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशीचा प्रस्ताव प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याक डे पाठविण्यात आला आहे.त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसिलदार पाटील यांनी सांगितले.————————————