लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना वडगाव खुर्दमधील धायरी फाटा परिसरात घडली आहे. ही घटना २० ऑगस्टला घडली असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सिंहगड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालानुसार महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पतीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा अजय निकाळजे (वय १९, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, धायरी फाटा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अजय निकाळजे (वय २२,रा. धायरी फाटा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे यांनी फिर्याद दिली आहे.
दिशा आणि अजय यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर अजय दिशाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात वादावादी होत होती. दरम्यान, २० ऑगस्टला दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात अजयने पत्नी दिशाला खाली पाडून गळा आवळला. त्यानंतर ओढणीने तिचा गळा घोटून खून करीत पळ काढला. याप्रकरणी सिंहगड रोड पोेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार दिशाचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वंदना तांदळे अधिक तपास करीत आहेत.