पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसकडे देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरातील मार्गांवर बस बंद पडत असून, गेल्या २० दिवसांत पाच बसगाड्या पेटल्या आहेत. शनिवारी सकाळी कोथरूड डेपोमध्ये उभी असलेली बस अचानक पेटली. त्यामुळे बसच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.बसगाड्यांची योग्य प्रकारे तपासणी न केल्यामुळे ब्रेकफेल होऊन बसचे अनेक अपघात झाले आहेत. त्यात नागरिकांचा हकनाक बळी गेला आहे. त्यात आता पीएमपीच्या बस अचानक पेट घेत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पीएमपी प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ३१ आॅगस्ट २०१६ ते १६ डिसेंबर २०१७ या कालावधीत १२ बसेसने पेट घेतला. त्यात २७ नोव्हेंबर २०१७ ते १६ डिसेंबर २०१७ या कालावधीत पाच बसगाड्यांना आग लागली होती. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या सर्व प्रकारांमुळे पीएमपी प्रशासनाकडून गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर लक्ष दिले जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.नोव्हेंबर महिन्यात सासवड दिवे घाट येथे, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकाच दिवशी चिंचवड व पुणे आरटीओ कार्यालयाजवळ बसला आग लागली होती. तसेच गणेशमळा येथेही बस पेटली होती.
वीस दिवसांत पेटल्या पाच पीएमपी बस, योग्य देखभाल होत नसल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 5:35 AM