पुणे : देशसेवेचे स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित दाखल झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. कारण अद्याप समजले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रबोधीनीच्या प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहे. हा विद्यार्थी १४७ व्या तुकडीचा विद्यार्थी असून ७ फेब्रुवारीलाच तो प्रबोधिनीत दाखल झाला होता.
जी प्रत्युष असे मृत्यू झालेल्या छात्राचे नाव आहे. प्रत्यूष हा मुळचा बंगळुरुचा राहणार आहे. प्रबोधिनीत सोमवारी (दि ७ ) दाखल झाल्यावर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि ८) प्रत्यूष हा त्याच्या हॉस्टेलच्या खोलीसमोर सायंकाळी ५ च्या समोर बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. अनेक प्रयत्न करूनही तो शुद्धीवर न आल्याने त्याला तातडीने प्रबोधिनीच्या परिसरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत प्रबोधिनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत कॅडेटच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. तसेच घटनेचा अहवाल स्थानिक पोलीस प्राधिकरणाकडे देण्यात आला आहे. तसेच छात्राच्या मृत्युचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनही केले जात आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आहेत.
प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वीच घडली घटना
जी प्रत्यूष हा एनडीएच्या १४७ तुकडीसाठी निवडला गेला होता. या प्रशिक्षणासाठी तो सोमवारी (दि ७) प्रबोधिनीत आला. अवघ्या काही दिवसात त्याच्या लष्करी प्रशिक्षणाला सुरवात होणार होती. मात्र, त्या आधीच त्याचा मृत्यू झाला.