लोणी काळभोर : गतवर्षी कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जो अनुचित प्रकार घडला होता, त्याची पुनरावृत्ती येत्या एक जानेवारीला विजयस्तंभ परिसरासह इतरत्र घडू नये, यासाठी जिल्हा (ग्रामीण) पोलिसांनी या वर्षी चोख बंदोबस्त लावला आहे. मागील वर्षी अनुचित प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आपापल्या हद्दीतील संशयास्पद हालचाली व अफवा पसरविणाºयांची नावे पोलिसांना तत्काळ कळवावीत, असे आवाहन ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी केले.कोरेगाव भीमा व परिसरात झालेल्या दंगलीला १ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या १ जानेवारीला होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एका कार्यालयात लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने पूर्व हवेलीमधील पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थीतांना मार्गदर्शन करताना संदीप जाधव यांनी वरील आवाहन केले.या वेळी हवेलीचे, पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चेतन चोरबोले, गणेश पिंगुवले, पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, तंटामुक्त समितीचे माजी जिल्हा समन्वयक रघुनाथ चौधरी, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दादा काळभोर, जिल्हा महिला पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षा रोहिणी हांडे यांच्यासमवेत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गावांतील सर्व पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य उपस्थित होते.जाधव म्हणाले, की मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी एक जानेवारीला विजयस्तंभ परिसरासह कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर, लोणीकंद, पेरणे परिसरात पाच हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असेल. पोलिसांना संदेशवहनासाठी बंदोबस्तावरील प्रत्येक अधिकाºयांकडे अत्याधुनिक वायरलेस यंत्रणा व आवश्यक ती सर्व साधने असणार आहेत.विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज : संदीप जाधवलोणीकंद : ‘‘१ जानेवारी रोजी पेरणे फाटा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाºया लोकांसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून येणाºया नागरिकांना काहीही अडचण येणार नाही. शांततेत कार्यक्रम होईल,’’ असा विश्वास अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव यांनी व्यक्त केला.पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येथील स्थानिक नागरिक व पोलीस यांच्या आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. पेरणे फाटा येथील विजयस्तंभ येथे होणाºया कार्यक्रमासाठी पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून येणाºया लोकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. पुण्याकडून येणाºया लोकांसाठी तुळापूर फाटा, लोणीकंद, खंडोबाचा माळ या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था,अहमदनगरकडून येणाºयांना सणसवाडीत वाहनतळाची व्यवस्था केली आहे. याच ठिकाणी मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी, जेवणाचे स्टॉल असतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, विद्युत, वाहतूक आदी महत्त्वाच्या विभागांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच, दोन्ही पार्किंग ठिकाणांहून पीएमपीच्या बसची व्यवस्था केल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.सुरक्षिततेच्या दृष्टीने ४५० सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, २३ रुग्णवाहिका, फायरब्रिगेड, तसेच १५ ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारणार आहेत. कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा फौजफाटा, समता सैनिक दल, ग्रामरक्षक, पोलीस मित्र तसेच शांतिदूत हे दल नागरिकांच्या मदतीसाठी असेल.
संशयास्पद हालचाली, अफवा पसरविणाऱ्या लोकांची नावे कळवा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:29 AM