बारामती : माळेगांव कारखान्याच्या मतमोजणी केंद्राच्या आत रात्रभर चौघे अनोळखी चौघेजण मुक्कामी असल्याचा आरोप कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्यांचा जबाब घेऊन त्याची पोहच देण्याची मागणी कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केली आहे.तोपर्यंत मतमोजणी सुरु होउ न देण्याचा पवित्रा तावरे यांनी घेतला आहे. त्यामुळे मतमोजणी सोमवारी(दि २४) सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु झाल्याचे चित्र होते.
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल मतदान संपल्यानंतर शहरातील जयश्री गार्डन येथे मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत.या मतपेट्यांना रात्रभर सत्ताधारी गटाच्या वतीने खडा पहारा देण्यात आला.आज सकाळी इमारतीतुन अनोळखी चौघेजण बाहेर असल्याचे सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी पाहिले. मतमोजणी केंद्रात थांबण्यास बंदी असताना हे चौघेजण आत आलेच कसे,असा आक्षेप सत्ताधारी गटाने घेतला. त्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.मतमोजणी सुरु होण्यापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. दरम्यान ते चौघेजण मतमोजणी प्रक्रियेतील कर्मचारी असल्याची माहिती पुढे येत आहे.मात्र, त्यांच्या ओळखपत्रावर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांची सही नाही. त्या चौघांचे जबाब घ्यावेत.त्याची पोहच आमच्याकडे द्यावी, त्याशिवाय मतमोजणी सुरु करु नये,अशी मागणी अध्यक्ष तावरे यांनी केली आहे.
यावेळी अध्यक्ष तावरे यांनी मागणी केल्यानंतर त्यांना स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाच्या वतीने दाखविण्यात आले.