पुणे : शेतकऱ्यांना भात लागवडीमधून अधिक उत्पादन मिळावे, तसेच नवीन तंत्रज्ञानातून कमी खर्चात अधिक फायदा व्हावा, यासाठी वेल्हे तालुक्यात रेनट्री फाउंडेशनकडून शेतकरी शाळा घेण्यात येत आहेत. भात हे वेल्हा तालुक्यातील प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांना या शेती शाळांचा चांगला फायदा होत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील ९ गावांमध्ये परसबागेतून घरच्या घरी भाज्या पिकविण्याचे प्रशिक्षणही रेनट्री फाउंडेशनतर्फे दिले जात आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन पद्धती शिकवून स्वयंपूर्ण बनवणे आणि शाश्वत शेतीचे उद्दिष्ट साधणे
हा या प्रशिक्षणाचा हेतू आहे. रेनट्री फाउंडेशन वेल्हे तालुक्यात गेली २ वर्षे काम करत आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘रेनट्री’तर्फे फिल्ड स्कूल म्हणजे शेती कार्यशाळा घेतल्या जातात. त्यामध्ये वेल्हा तालुक्यातील ९ गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सिस्टिम ऑफ राइस इनटेन्सिफिकेशन’ (श्री पद्धत) शिकवण्यात आली आहे. या पद्धतीत कमी पाणी, कमी खर्च आणि शाश्वत शेतीमधून अधिक उत्पादन काढले जाते. भात लागवडीसाठी सघन भात लागवड ही पद्धत शेतकऱ्यांना सांगितली आहे. आपल्याकडेही खूप केली जात नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. सुमारे २५ बाय २५ सेंटीमीटरमध्ये रोपांची लागवड करण्यात येते. अनेकदा शेतकरी भात रोपांची मोठी जुडी लावतात, आम्ही फक्त पाच रोपटी लावायला सांगितली. त्याला फुटवे अधिक येतात आणि सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. परिणामी, उत्पादन दीडपटीने वाढते, अशी माहिती रेनट्रीकडून दिली.
—————
११० कुटुंबांनी घेतला परसबागेचा लाभ
वेल्हा तालुक्यातील अनेक कुटुंबीयांना लॉकडाऊन काळात भाजीपाला मिळत नव्हता. या काळात त्यांना परसबागेची संकल्पना शिकवली गेली. याबाबत डॉ. संतोष सहाने यांनी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. सुमारे ११० कुटुंबांनी यात सहभाग घेऊन १४ प्रकारच्या भाज्या लावल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये या परसबागेचा उपयोग झाला.
—————————-
मी श्री पद्धतीने भाताची लागवड केली. त्यामुळे मला अधिक उंचीचे भात रोप आणि अर्ध्या फुटापर्यंत लांब लोंब्या मिळाल्या आणि उत्पन्न वाढले. कमी खर्च, अधिक उत्पन्न मिळाले आहे.
- अजुर्न रांजणे, शेतकरी, साखर गाव, ता. वेल्हा
-------------------