लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा पुकारणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळावे यासाठी ब्राह्मण महासंघाच्याने ५५ हजार सह्या गोळा करण्याची मोहीम चालू केली आहे. शुक्रवारी (दि.२६) रमणबाग चौकातून या मोहिमेचा प्रारंभ झाला. चौकात उभारलेल्या बॅनरवर दिवसभरात ९ हजार सह्या झाल्या. हा पहिला बॅनर उद्या शनिवारी (दि.२७) दिल्लीला पाठविला जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (दि.२६) सुरू केलेली ही मोहीम पुढील आठवडाभर शहरातील प्रमुख चौकात चालवली जाणार आहे. रमणबाग चौकात उभारण्यात आलेल्या बॅनरवर महापौर मुरलीधर मोहोळ आणि निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी सह्या करून मोहिमेला प्रारंभ केला.
“ब्रिटिशांनी वापरलेल्या ‘फोडा आणि झोडा’ या नीतीविरोधात भारतीयांनी पुन्हा एकजूट होण्याची आज गरज आहे. सावरकरांचा आदर्श ठेवून देशाला एकसंध केले पाहिजे,” असे निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले. सावरकर यांना भारतरत्न मिळावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. एकीचे फळ नक्कीच मिळेल, असे महापौर मोहोळ म्हणाले.