पुणे : शहरात स्वॅब कलेक्शन सेंटरची कमतरता भासत असल्याने, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयासाठी स्वतंत्र स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच आत्तापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या कारणांचा सविस्तर अहवाल मागविण्यात येणार असून, या कारणांचा अभ्यास करून मृत्यूदर कमी करण्यासाठी उपचार व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुणे शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी महापौर मोहोळ यांच्या उपस्थितीत, राज्य शासनाचे समन्वय अधिकारी, पुणे मनपाचे अधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी महापौर मोहोळ यांनी, आगामी काळामध्ये मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजनबध्द काम व त्यादृष्टीने अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. याकरिता खाजगी डॉक्टर्स व आयसीएमआर मान्यताप्राप्त लॅब व्यवस्थापनाकडून कोरोना रूग्ण आणि संशयित रूग्णांचा वैद्यकीय इतिहास सादर करणे यापुढे बंधनकारक करणार असून, त्यासाठी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात येणार आहे़ त्यामुळे अशा रूग्णांवर वेळ वाया न जाता तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. याचबरोबर शहरात अॅम्ब्युलन्सची संख्या वाढविण्यात येणार असून, प्रत्येक परिमंडळास ३ अॅम्ब्युलन्स अशा १५ अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलीस यंत्रणेबरोबर चर्चा करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र नव्याने निर्माण करण्यात यावे़ व या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व को-मॉर्बिड व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी करण्यात याव्यात. यासाठी मनपा प्रशासनाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात यावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून त्यांना तातडीने उपचार मिळावेत अशा सूचनाही मोहोळ यांनी यावेळी प्रशासनास दिल्या. याकरिता प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय एक स्वतंत्र समन्वयक नेमून आयसीयू बेडस्, ऑक्सिजन बेडस् यांची उपलब्धता स्मार्ट सिटी प्रणाली व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विनाविलंब माहिती घेऊन रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे. याचबरोबर आयसीयू बेड मिळाले नाही म्हणून रूग्णांची परवड होणार नाही याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांमध्ये स्वॅब कलेक्शन सुरू करणार : महापौर मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 8:36 PM
आगामी काळामध्ये कोरोना रूग्ण मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजनबध्द काम व त्यादृष्टीने अभ्यास करण्याची आवश्यकता
ठळक मुद्देकोरोना रूग्ण आणि संशयित रूग्णांचा वैद्यकीय इतिहास सादर करणे बंधनकारक