छत्रपती कारखान्यावर
शेतकरी येणार एकत्र
बारामती: मागील हंगामातील उसाच्या थकीत एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आज (दि २) छत्रपती कारखान्यावर संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी एकत्र येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अमरसिंह कदम यांनी आज दिली.
कायद्याप्रमाणे कारखान्यात गळीतास ऊस आल्यापासून १४ दिवसांच्या आत ‘एफआरपी’ देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक महिने होऊन गेले तरीही कारखाना शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीची थकीत रक्कम देत नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन तारखेला छत्रपती कारखान्यावर एकत्र येणार आहे. केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीसाठी एका किलोस फक्त पाच पैसे दरवाढ करून शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टाच केली आहे. शेतीशी संबंधित सर्व सेवांचे, वस्तूंचे दर वाढले आहेत. पेट्रोल, डिझेल, मजुरी, मेहनतीचे दर, अवजारांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा विचार न करता एका किलोस पाच पैसे म्हणजेच एका टनास पन्नास रुपये दरवाढ करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सोळा महिने ऊस शेतात मुलाप्रमाणे जपायचा, त्याची पूर्ण एफआरपी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे, असे अमरसिंह कदम यांनी सांगितले.