लोणावळा :लोणावळा नगर परिषदेने सलग पाचव्यांदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात मानाचा तुरा खोवला आहे. लोणावळा नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी अव्वल राहून देशपातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात ५० हजार ते एक लाख लोकसंख्या या गटात लोणावळा शहर सर्वांत स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर हा सन्मान सोहळा कार्यक्रम पार पडला. लोणावळा नगर परिषदेमार्फत मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहर समन्वयक अक्षय पाटील, नगर अभियंता वैशाली मठपती, नगर परिषद अभियंता यशवंत मुंडे, खरेदी पर्यवेक्षक दत्तात्रय सुतार, सहायक ग्रंथपाल विजय लोणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लोणावळा नगर परिषद ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कायमच अग्रेसर राहिली आहे. यात सर्व नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार संघ, सामाजिक संस्था, शाळा व नागरिक यांच्या मुळेच हे यश असे अबाधित राहिले असल्याचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले. त्यासोबतच यापुढेही स्वच्छ सर्वेक्षणात सातत्यपूर्ण कामगिरी राखण्याचा, तसेच लोणावळा शहराला स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याचा मानस व्यक्त केला.