लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षण भरतीच्या भरतीच्या घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची प्रतिमा डागाळली. यामुळे अनेक शिक्षकांच्या नियुक्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिक्षण विभागाची ही मलीन झालेली प्रतिमा पुन्हा सुधारण्यासाठी या विभागात ‘स्वच्छता मोहीम’ राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत बोगस नियुक्त्या तपासण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १८ हजार शिक्षकांच्या नेमणुका तसेच त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. तपासणीत गैरप्रकार आढळ्यास अशांवर कारवाई करण्यासाठी त्यांना शिक्षण संचालकांना सांगितले जाणार आहे.
जिल्ह्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद असतानाही अनेकांनी बोगस कागदपत्रांच्या साह्याने नियुक्त्या देण्यात आल्या. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची सखोल चौकशी झाल्यावर माध्यमिकच्या अनेक शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने नियुक्त केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घोटाळ्यात अनेकजण गुंतले असल्याने सखोल तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाला दिले आहेत. या सोबतच या घोटाळ्यामुळे जिल्हापिरषदेच्या शिक्षण विभागाची प्रतिमा डागाळल्याने ती पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १८ हजार शिक्षकांच्या नियुक्त्या तसेच कागदपत्रे तपासण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. या मोहिमेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या नियुक्तीपत्र, वेतनश्रेणी, पदमान्यता आदी कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
लवकरात लवकर या तपासणीसाठी नियोजन करण्यात यावे तसेच बोगस शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी त्यांची यांची शिक्षण संचालक विभागाकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
चौकट
शिक्षण विभागात जवळपास १८ हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक भरतीच्या घोटाळ्यामुळे अनेकांच्या नियुक्त्या या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यामुळे चुकीच्या पद्धतीने भरती झालेच्या शिक्षकांचा मोहिमेत निवाडा लागणार आहे.
कोट
शिक्षण भरती घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाबद्दल अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात येत आहेत. यामुळे शिक्षण विभागाची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात त्यांची नियुक्तीपत्रे, पदमान्यता, वेतनश्रेणी यांसारखी कागदपत्रे तपासली जाणार आहे.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
कोट
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या तपासणीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तपासणीचे नियोजन सुरू आहे. येत्या आठवड्यात याबाबत कारवाई केली जाणार आहे.
सुनंदा वाघारे, शिक्षणाधिकारी माध्यमिक