पुणे : भारत हा राष्ट्रीय एकात्मकता जपणारा देश आहे. आपल्या देशात विविधतेतून एकता पाहायला मिळते. ती वैविध्यता इतर देशांमध्ये पाहायला मिळत नाही. स्वामी विवेकानंदांनी सर्वप्रथम या एकतेचे दर्शन जगाला घडविले.शिकागो येथे त्यांनी दिलेल्या असामान्य भाषणाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने आयोजित ’ग्लोबल हार्मनी २०१८ ’ या राष्ट्रीय स्तरावरील चौदाव्या बहुभाषिक नृत्य,नाट्य संगीत महोत्सवाच्या समारोपामध्ये श्याम बेनेगल यांना ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय कलाकीर्ती’ पुरस्कार देऊन संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक संघाचे सचिव हेमंत वाघ, कार्याध्यक्ष प्रा. श्याम भुर्के, मुकुंद नगरकर, श्रेयसी गोपीनाथन,सुरश्री दीपा शशीधरन, गिरीराज जमेनिस, उज्वला नगरकर, आदी उपस्थित होते. बेनेगल म्हणाले, आधुनिक काळात भारतीयांना विविधतेतून एकतेची प्रचिती स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून अनुभवास मिळाली. शिकागो येथे २३ सप्टेंबर १८९३मध्ये जगभरातील धार्मिक परिषदेत त्यांनी दिलेले असाधारण भाषण त्याची साक्ष देणारे ठरले. आपल्या देशाने हा एकतेचा मूलमंत्र जगाला दिला. त्याचे श्रेय विवेकानंदाना जाते. तीस वर्षांपूर्वी जवाहरलाल नेहरू यांच्या ’डिस्क्व्हरी आॅफ इंडिया’ या पुस्तकावर आधारित भारत एक खोज ही ५३ भागांची मालिका बनवली होती. याव्यक्तिरिक्त इतर ठिकाणाहून माहिती संकलित करून भारताच्या व्यापक इतिहासाची ओळख करून देण्यात आली. त्या मालिकेतील एक भाग स्वामी विवेकानंद यांच्या कार्यकर्तृत्वाला समर्पित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धा महोत्सवात नाट्यछटा विभागात उत्तर-दक्षिण संस्थेच्या ‘महामाया’ नाट्यछटेने प्रथम क्रमांक तर पदमप्रिया महिला सांस्कृतिक गोष्टी या संस्थेच्या ‘माया’ या नाटकाने व्दितीय क्रमांक पटकावला. ब्लँकआऊट प्रॉडक्शनच्या ‘लग्नबंबाळ’ या नाट्यछटेला तिसरा क्रमांक मिळाला. लोकनाट्यामध्ये ‘मीत मॉं’( आदिम ग्रृप) तर सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार थिएटर ट्रान्सफर्मेंशनच्या ‘चितळे मास्तर’ ने पटकावला. या कार्यक्रमात भरतनाट्यम, कथकली, कथ्थक, ओडिसी, मोहिनी अट्टम, कुचीपुडी, उपशास्त्रीय, मॉर्डन डान्स या नृत्यप्रकारांसह गायन व वादन विभागातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले. हेमंत वाघ यांनी आभार मानले.------------------------------------------------------------संघाच्या उपक्रमामुळे अनेकांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. या स्पर्धेतील निवडक कलाकारांना घेऊन लवकरच दुबई येथे ‘सांस्कृतिक आॅलम्पियाड’ चे आयोजन करण्यात येणार असल्याचे रत्ना वाघ यांनी जाहीर केले.