पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सून आणि हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर (वय ८३) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्य़क्ष रणजित सावरकर हे त्यांचे पुत्र होत.
स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले. नागपूर येथील पांडुरंग गोखले परिवारात त्यांचा १८ डिसेंबर १९३९ या दिवशी जन्म झाला. त्यांचा विवाह नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रम यांच्यासमवेत झाला. पृथ्वीराज आणि रणजित ही त्यांची दोन मुले असून, पृथ्वीराज सावरकर यांचे नुकतेच निधन झाले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपत स्वामिनी यांनी विक्रम सावरकर यांना त्यांच्या संघटन कार्यात साथ देत ‘प्रज्वलंत’ या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज सांभाळले. मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या उभारणीत तसेच संस्थेचे कार्यात त्यांचा कायम सक्रीय सहभाग राहिला. विक्रम सावरकर यांच्या युद्ध आमुचे सुरु (नवी आवृत्ती - मनःस्वी) तसेच कवडसे या पुस्तकांमध्ये त्यांनी सहभाग दिला. ‘यशोगीत सैनिकांचे’ हे पुस्तक स्वामिनी सावरकर यांनी नुकतेच लिहिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवरील कार्यासाठी त्या नेहमीच प्रोत्साहित करत असत.