- विशाल शिर्केपुणे : शहरात श्वानदंशाच्याच नव्हे, तर रेबिजची लागण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वानदंश पुणेकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात १९ जणांना रेबिजमुळे प्राण गमवावे लागले असून, तीन व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहेत.श्वानदंशाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात जानेवारी ते जुलै दरम्यान ५ हजार ५८४ नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात करण्यात आली आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक १ हजार २४४ श्वानदंशाच्या घटना घडल्या. त्यानंतर उपचारात झालेल्या विलंबामुळे तब्बल १० जणांना रेबिजची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण मृत्यूशी झुंज देत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात प्रत्येकी १ आणि जूनमध्ये २ आणि जुलैमध्ये तीन जणांचा रेबिजने मृत्यू झाला आहे.शहरात २०१७ मध्येदेखील अशीच स्थिती होती. त्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत तब्बल ९ हजार ३८७ जणांनाश्वानदंश झाला होता. आॅक्टोबर २०१७ मध्ये सर्वाधिक ११४५जणांना श्वानदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली होती. त्यातील १२ जणांना पुढे रेबिजची लागण झाल्याने आपले प्राण गमवावे लागले.सर्वाधिक ४ मृत्यूची मे २०१७मध्ये नोंद झाली होती. जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी दोन, जून,आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी १ मृत्यूझाला होता. श्वानदंशानंतर उपचार घेण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे रेबिज लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.दुर्लक्ष नको : कुत्र्यांचे लसीकरण झाले असल्यासही धोका श्वानदंशाबाबत माहिती देताना जनरल पॅ्रक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरक म्हणाले की, श्वानदंश झाल्यानंतर, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.जखम झाल्यानंतर, ती धारेच्या पाण्यात साबणाने स्वच्छ करावी. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने चार लशींचा डोस घ्यावा. हा डोस संपूर्ण घेतलाच पाहिजे; अन्यथा रेबिजचा धोका कायम राहतो.भटक्या आणि पाळीव श्वानाच्या चाव्यामुळे देखील रेबिजचा धोका असतो. पाळीव श्वानाला लसीकरण केले असले, तरी देखील धोक्याची तीव्रता कायम असते.- महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही संख्या तब्बल २ लाखांच्या घरात गेली असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.- शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणारा कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून, त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमित पणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. सध्या दररोज सरासरी ७० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते.श्वानदंशानंतर जखम २० मिनिटे नळाच्या पाण्याखाली धरून साबणाने धुतली पाहिजे. त्यानंतर तत्काळ आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा सरकारी दवाखान्यातून उपचार घेतले पाहिजे. श्वान, मांजर, डुक्कर अशा प्राण्यांच्या चाव्यामुळे अथवा नखाने ओरबडल्याने झालेल्या जखमेमुळेदेखील रेबिज होऊ शकतो. जखम कोणत्या भागात झाली यावरून लशीचा प्रकार ठरतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घेतले पाहिजेत. श्वानदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर आळा घातला पाहिजे.- प्रवीण दरक,अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
श्वानदंश जीवघेणा; दीड वर्षात १९ जणांचा झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 5:08 AM