पुणे/मुंबई - एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने ताणतणाव आणि नैराश्यातून सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नसल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. 29 जून रोजी पुण्यातील फुरसुंगी येथे ही घटना घडली होती.
MPSC च्या 2019 च्या पूर्व व मुख्य परीक्षेत स्वप्नील लोणकर उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. तसेच, 2020 मध्येही त्याने एमपीएससीची परीक्षा दिली. त्यातही, तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. याच तणावातून त्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. आता, स्वप्नीलची जी मुलाखत गेल्या दीड वर्षापासून झालेली नव्हती, त्या मुलाखतीच्या यादीमध्ये स्वप्नील लोणकर हे नाव झळकलं आहे.
MPSC ने 14 डिसेंबर रोजी 2020 मधील एमपीएससी परीक्षेतून मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, दुसऱ्या क्रमांकावर स्वप्नील लोणकरचे नाव असून 7 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजता स्वप्नीलला मुलाखतीसाठी बोलविण्यात आलं आहे. स्वप्नीलचं हे नाव पाहून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तर, पुण्यातील स्वप्नीलच्या मित्रांनाही अश्रू अनावर झाले.
स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारविरुद्ध मोठा असंतोष उफाळून आला होता. स्वप्नीलला न्याय मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन पुकारले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच स्वप्नीलचा जीव गेला असा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते. तर, विधानसभेतही याचे पडसाद दिसून आले होते.
विधानसभेतही पडसाद
स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले होते. भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही MPSC परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी स्वप्निल लोणकरची सुसाईड नोटच सभागृहात वाचून दाखवली होती.