सासवड : छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची निर्मिती ही मानवतावादी हितासाठी केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन, ज्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या व्यक्तीला मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे दिली. आग्रा येथून केलेली सुटका, अफझलखानाचा वध, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर अशा अनेक सरदारांनी व मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठीआपले प्राण अर्पण केले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी खऱ्या अर्थाने सोशल इंजिनियरिंग केले, असे मत शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारायण टाक यांनी व्यक्त केले.छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त वाघिरे महाविद्यालय सासवड येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे होते. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम, डॉ. किरण रणदिवे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम यांनी केले. टाक यांचे छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि त्यांचे सोशल इंजिनियरिंग या विषयावर व्याख्यान झाले. छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचे आर्थिक विचार, स्त्रियांविषयी असणारी भूमिका, पर्यावरण, बौद्धिक चातुर्य, व्यवस्थापन, पुरंदरचा इतिहास, स्वराज्य निर्मितीमागील भूमिका, स्वराज्यनिर्मिती ही अन्यायाविरुद्ध असणारा लढा होता इत्यादीविषयी सविस्तर विवेचन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. साळवे यांनी, आजच्या सामाजिक वातावरणात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य, त्यांचे शेती, व्यापार, लष्कर, आरमार संघटन इत्यादींविषयीचे विचार व कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या जीवनकार्याचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. किरण रणदिवे यांनी आभार मानले.
मानवतावादी हितासाठी स्वराज्याची निर्मिती
By admin | Published: February 21, 2017 2:04 AM