पुणे: राजकारणात चांगले आहेत तसेच वाईटही आहे. अनेकांना माज आला आहे. स्वराज्य संघटना त्यांचा तो माज उतरवेल अशा कडक शब्दात स्वराज्य पक्षाचे प्रमुख व माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी राजकारण्यांची हजेरी घेतली. स्वराज्य पक्षाच्या बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी सन २०२४ मधील निवडणुकांचा बिगूल फुंकला.
स्वराज्य संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण शनिवारी सकाळी संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. युवराज्ञी संयोगिता राजे, युवराज शहराजीराजे तसेच संघटनेचे राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचेती रूग्णालयाजवळील या कार्यालयापासून शोभायात्रा काढण्यात आली. त्यातही छत्रपती संभाजीराजे कुटुंबासहित सहभागी झाले होते. झेंडे, तुताऱ्या, साहसी खेळ, घोषणा व जयघोषात शोभायात्रा बालगंधर्व रंगमंदिरात विसर्जीत करण्यात आली. तिथे पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव यांनी स्वागत व प्रास्तविक केले. व्यासपीठावर पक्षाचे उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, राजेंद्र कोंढरे, श्रीमंत कोकाटे, माधव देवसरकर, विनोद साबळे, करण गायकर, अंकुश कदम, फत्तेसिंग सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, शिवाजीमहाराजांचे, महाराष्ट्रातील संतांचे नाव घेत राजकारणी राजकारण करतात व राज्यातील रयतेवर अन्याय करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती हा अन्याय मिटवण्यासाठीच. स्वराज्य पक्षाचे उद्दीष्टही तेच आहे. गरीब, कष्टकरी यांच्यातूनच स्वराज्य पक्ष उभा राहणार आहे. मागील ८ महिन्यांच्या दौऱ्यात सर्व थरातून पाठिंबा मिळाला. त्यामुळे आता आत्मविश्वास बळावला आहे. सन २०२४ ची निवडणूक स्वराज्य पक्ष लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी त्याच्या तयारीला लागावे. अधिवेशनाच्या सुरूवातीला शिक्षण, आरोग्य व अन्य क्षेत्राबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले. चित्रे यांनी आभार व्यक्त केले.