लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : स्वराज्य पक्षाच्या वतीने मुंबईत केंद्र व राज्य सरकारने घोषणा केलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्याची मोहीम रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे. पक्षाचे अध्यक्ष माजी खा. संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यासाठी कार्यकर्ते मुंबईवर धडक मारणार आहेत.
आजतागायत या स्मारकाचे काय झाले?
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी धनंजय जाधव यावेळी उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या शिवस्मारकाची घोषणा केली. सन २०१६ मध्ये मुंबईत पंतप्रधानांना आणले गेले. त्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक होती, म्हणून हे करण्यात आले. असे म्हणावे लागते याचे कारण त्यानंतर आजतागायत त्या स्मारकाच्या कामाचे काय झाले? याबद्दल केंद्र किंवा राज्य सरकारचे कोणीही बोलायला तयार नाही.
राज्यात आघाडी सरकार आले, त्यावेळी त्यांनीही या स्मारकाबाबत काहीच केले नाही. याचा सरळ अर्थ सत्ताधारी असोत अथवा विरोधक त्यांना शिवप्रेमींच्या भावनेशी खेळायचे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा आहे, असाच होतो. स्वराज्य पक्ष या अक्षम्य दुर्लक्षाच्या विरोधात आवाज उठवणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले.