पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे अंत्यसंस्कार सोमवारी दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ च्या दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहेत. त्याआधी सकाळी ९ ते १२ या वेळेत 'स्वरमयी गुरुकुल', संभाजी उद्यानासमोर, शिवसागर हाॅटेल मागे, शिवाजीनगर, पुणे येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
प्रभाताई यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले, परंतु त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. पण आता अंत्यसंस्कार हे सोमवारीच होतील. सोमवारी दुपारी १२ वाजता जंगली महाराज रस्त्यावरुन वैकुंठ स्मशानभूमीत अंत्ययात्रा मार्गस्थ होईल, असे डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती यांनी कळवले आहे. अंत्यदर्शन प्रसंगी कोणीही छायाचित्र चित्रीकरण करु नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
प्रभाताई या अतिशय नावाजलेल्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरी बद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. या वेळी कला, साहित्य, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.